Skip to content
Home » काहीवेळेस सल्ल्या देण्याची नाही तर समजून घेण्याची गरज असते.

काहीवेळेस सल्ल्या देण्याची नाही तर समजून घेण्याची गरज असते.

काहीवेळेस सल्ल्या देण्याची नाही तर समजून घेण्याची गरज असते.


टीम Healthy मानसशास्त्र


प्रसाद हा खूप वेगळ्या स्वभावाचा.. सगळ्यांना त्याच्याशी बोलायला आवडायचं, त्याच हसणं हे इतरांपेक्षा खूप निराळं आणि खेळकर वृत्तीचा.
प्रसाद ज्याच्या सोबत रहायचा त्याला कधी आणि कशी वेळ निघून जाते हे सुद्धा कळत नाही.

त्याला घडणाऱ्या घटना जरी casually घ्यायची सवय नसली तरी त्यांना गंभीर करण्याची सवय नव्हती. कोणी त्याला अगदी एखाद्या विषयात, दुःखात अडकलेलं,रडत बसलेल, चिंता करत बसलेल पाहिलं नव्हतं कारण काहीही झालं तरी तो त्यातून मार्ग काढायचा, स्वतःला त्यामधे गुंतून ठेवत नव्हता आणि कोणाच्या सल्ल्याची उपदेशाची गरज जाणवू देत नव्हता आणि जरी कोणी त्याला सल्ला दिला तरी त्यावेळी राग न करता सोडून द्यायचा. जसा तो त्याच्या आयुष्याविषयी प्रचंड उत्साही होता अगदी तसाच तो इतरांसाठी सुद्धा असायचा.

कोणाला दुःख असेल, कोणी चिंता करत असेल, खूप जास्त तणावात असेल तर त्यावेळी त्या व्यक्तीला तो उपदेश न देता.. त्या व्यक्तीला त्या प्रसंगातून बाहेर कस काढता येईल याचा प्रयत्न करायचा… त्या व्यक्तीला कस हसवायच.. तिच्या कपाळावरील आठ्या कशा कमी करता येतील.. सारखं तोच विचार करणाऱ्या व्यक्तीला वेगळ्या विषयात कस रमवायच, त्या व्यक्तीचं रडू कस थांबेल.. यासाठी त्या व्यक्तींना अजिबात सल्ले देत नसायचा.

फक्त वेगवेगळे विषय काढायचे, विनोद करायचे, जुने तसेच आजूबाजूला घडलेले किस्से सांगायचे तर कधी त्या व्यक्तीला बाजूला घेऊन शांत बसायचं आणि काहीवेळाने त्याला बोलत करायचं.. अशा एक ना अनेक शक्कल लढवत प्रसाद समोरच्या व्यक्तीचा मूड पूर्ण बदलायचा.

समजा एखाद्याच्या जवळची व्यक्ती त्याला कायमची सोडून गेली अशावेळी जर आपण जाऊन त्याला सल्ला दिला की आता अस कर तस कर, जी व्यक्ती सोडून गेली तिचा विचार करणं सोडून दे, सतत रडत बसू नकोस, जे घडलं त्यामधे आपण कोण बदल करणारे … असं जर आपण दुःखी व्यक्तीला बोललो तर नक्कीच तिला अजून जास्त दुःख दाटून येईल…. ती स्वतःला अजून जास्त त्रास करून घेईल.

आपल्याला कोणाची आठवण येतेय म्हणून आपण शांत बसलेलो असताना कोणी येऊन आपल्याला काय रे जास्त आठवण येतेय का.. आता काय करायचं तिथे जाऊन त्या व्यक्तीला भेटणं तर शक्य नाही असे प्रश्न विचारून आपल अजून जास्त मन भरून येते.

असे अनेक प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात ज्यावेळी आपल्याला काहीच सुचत नसते, काय बोलावं कळत नाही आणि काही ऐकावस सुद्धा वाटत नाही. आणि त्यावेळी जर कोणी येऊन आपल्याला सल्ला दिला की आपल्याला अजून जास्त वाईट वाटते नाहीतर राग येतो.

प्रसाद सारखं जर आपण सर्वच वागलो तर नक्कीच सल्ला देण्याची कोणालाच गरज पडणार नाही. कारण आपलं तसेच समोरच्या व्यक्तीचं दुःख जरी सहज दूर करता येत नसेल तरी अशावेळी काय केलं पाहिजे ज्यामुळे ती व्यक्ती दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल हे आपल्याला एकदा कळलं की आपण सल्ला न देता त्याला वेगळ्या पद्धतीने समजावू..

आपल्या जवळच्या व्यक्ती दुःखात असेल तर आपल्याला सहन होत नाही आपल्याला त्या व्यक्तीचं दुःख बघवत नाही मग त्यांना मोकळं वाटेल आनंद मिळेल यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि या आपल्या प्रयत्नांतून तो अजून जास्त दुःखी व्हायला नको, जास्त भावूक व्हायला नको अस जर आपल्याला वाटत असेल तर कोणी न मागता आपण सल्ला देऊ नये आणि वेगवेगळ्या पद्धतीने जस प्रसाद करतो अगदी तशाच निराळ्या पद्धतीने त्या व्यक्तीचं दुःख कमी करू शकतो.

सुख दुःखात साथ देणं याचा अर्थ फक्त त्यावेळी सांत्वन करणारे शब्द आणि सल्ले किंवा सहानुभूती व्यक्त करणे अस नसते. तर त्या व्यक्तीला कशा पद्धतीने आनंदी ठेवायचं, कधी एक जुने विनोदी किस्से सांगावेत तर कधी वेगळ्या विषयावर गप्पा माराव्यात, कधी शांत राहायचं तर कधी समोरच्या व्यक्तीला शांत राहू नाही द्यायचं, कधी फक्त हातात हात घेऊन धीर द्यावा तर कधी घट्ट मिठी मारावी, बस अजून काय हवं….यालाच तर साथ देणं म्हणतात.तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!