Skip to content
Home » संघर्ष करण्याची तयारी असणारी पाऊलं कधीच थकत नाहीत.

संघर्ष करण्याची तयारी असणारी पाऊलं कधीच थकत नाहीत.

संघर्ष करण्याची तयारी असणारी पाऊलं कधीच थकत नाहीत.


मेघश्री श्रेष्ठी


प्रत्येकाच्या आयुष्यात एक निश्चित ध्येय असते स्वप्न असते. काहीजण शेवटपर्यंत या स्वप्नांचा पाठलाग करतात तर काहीजण मध्येच थकून जातात. ज्यांना शेवटपर्यंत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे जमले ते इतिहास घडवतात आणि ज्यांनी आपली स्वप्ने अर्ध्यातच सोडली ते फक्त नोंद बनून राहतात.

आयुष्याच्या प्रवासात अडचणी आणि अडथळे तर प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. जे लोक अडचणींचा बाऊ करतात ते अडचणीतच गुरफटून जातात. ज्यांना अडचणींचा बाऊ न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता येतं, त्यांच्या पुढील अडचणी पालापाचोळ्या प्रमाणे उडून जातात.

श्रद्धाला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिच्या हालचाली तिच्या लकबी एका जन्मजात नर्तकीला शोभतील अशाच होत्या. तिने नृत्य शिकण्याची इच्छा आपल्या आई-बाबांजवळ बोलून दाखवली. पण, घरंदाज कुटुंबातील मुली असलं काही शिकत नसतात अशी सबब देऊन बाबांनी तिची मागणी उडवून लावली.

बाबांची नाराजी पाहून श्रद्धाने नृत्य हा विषयच आपल्या प्राधान्यक्रमातून उडवून लावला. ती जाणूनबुजून आपले लक्ष इतर गोष्टीत रमवू लागली. तरीही तिला कोणत्याच गोष्टीत मन रमत नव्हते. कुठलीही नवी गोष्ट शिकताना तिला आत्मविश्वास उरला नाही. आलेल्या प्रत्येक अडचणी तिला डोंगरासारख्या भासू लागल्या. बाबांच्याबद्दल तर तिच्या मनात प्रचंड अढी निर्माण झाली. एकामागून एक निराश विचारांत ती इतकी गुरफटून गेली की आपल्याला आपली स्वप्ने आहेत हेही नंतर तिच्या विस्मरणात गेले.

याउलट तिची मैत्रीण प्रिया. प्रियाला फुटबॉलमध्ये रस होता. पण मुलींना अशा क्षेत्रात वाव नसतो असे म्हणत प्रीयाच्या बाबांनी प्रियालाही विरोध केला. मात्र प्रियाच्या मनातून काही केल्या फुटबॉल जात नव्हता. कॉलेजमध्ये गेल्यावर ती कॉलेजनंतर तासनतास फुटबॉलची प्रॅक्टिस करू लागली.

तिच्या कॉलेजमधील क्रीडाशिक्षक तिला योग्य ते प्रशिक्षण मिळेल याकडे स्वतःहून लक्ष देत असत. मात्र प्रियाला घरी यायला उशीर झाला की तिचे बाबा तिची चांगलीच खरडपट्टी काढत. दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रिया मैदानात उभी राहत असे तेव्हा ती आपली सगळी ऊर्जा फक्त आणि फक्त फुटबॉलवरच लावत असे. आदल्या दिवशी बाबांनी कितीही अपमान केला असला तरी तिच्यातील उर्जेला योग्य ठिकाणी वाव मिळत असल्याने तिच्या मनात कुणाबद्दल कसलीच अढी राहत नव्हती.

प्रियाची राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली तेव्हा बाबांची परवानगी मिळाली नाही. तरीही तिने आपली जिद्द सोडली नाही. ती स्पर्धेसाठी गेलीच. दरवेळी कुठल्याही स्पर्धेसाठी जाताना तिला हा घरातील विरोध अपेक्षितच होता. ती वादावादीवर लक्ष केंद्रित न करता आपल्या सरावावर लक्ष केंद्रित करू लागली.

हळूहळू प्रिया फुटबॉलमध्ये इतकी तरबेज झाली की तिची राज्य फुटबॉल संघाच्या कोच पदी निवड झाली. पेपर आणि टीव्ही वरून तिच्या कौतुकाच्या बातम्या झळकू लागल्या. बाबांनाही आपला विरोध किती चुकीचा होता हे कळून चुकले होते.

पण प्रियाने तोपर्यंत हार मानली नव्हती जोपर्यंत तिला तिचे यश मिळत नव्हते. तिने कधीच आपला फोकस फुटबॉल आणि सराव यावरून हटवला नाही. घरातील विरोधाचा बाऊ केला नाही. प्रत्येक दिवस तिच्यासाठी कसोटीचे कितीतरी क्षण घेऊन येत होता पण तिचे लक्ष्य एकच होते.

फुटबॉल! आपल्या सगळ्या चिंता तिने त्या फुटबॉलमध्येच भरून ठेवल्या आणि त्यांनाच तीसंपूर्ण ताकदीने लाथ मारून उडवून लावत होती. पाहता पाहता तिच्या समोरील चिंता तिच्या उर्जेपुढे कमकुवत पडत गेल्या आणि अडथळ्यांपेक्षाही तिची स्वप्नं जास्त मोठी होत गेली.

प्रियाला एकच गोष्ट चांगली माहिती होती ती म्हणजे थांबला तो संपला. म्हणूनच संघर्षाच्या काळातही तिच्या पावलांनी कधी हार मानली नाही. प्रियाचे सातत्य आणि आपल्या स्वप्नांवरील दृढ विश्वास हीच प्रियाच्या यशाची गुरुकिल्ली होती.

तुम्हाला कोणीही मागे खेचू शकत नाही. पण, ज्यादिवशी तुमच्या मनानेच हार मानली त्यादिवशी तुम्हाला कोणीही जिंकवून देऊ शकणार नाही. सतत स्वतःच्या मनाला एवढेच सांगा की, संघर्ष करणारी पावले कधी थकत नाहीत. त्यांना फक्त चालत राहणे एवढेच माहिती असते.तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!