Skip to content
Home » लोकांकडून आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ का घेतला जातो?

लोकांकडून आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ का घेतला जातो?

लोकांकडून आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ का घेतला जातो?


श्री. राकेश वरपे I ९१७५४२९००६

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


आपल्या सर्वांनाच अनेकदा अनुभव आले असतील. काही प्रसंगी आपण समोरच्या व्यक्तीला काहीतरी सांगतो पण ते मात्र त्याचा भलताच अर्थ लावून मोकळे होतात. आणि यात होते काय तर आपल्याबद्दल इतरांना गैरसमज होतात आणि जो चुकीचे अर्थ लावतो तो सुद्धा असे गैरसमज करून आपल्यापासून दूर होतो किंवा आपली सगळ्यांसमोर असलेली प्रतिमा कळत नकळत बिघडवण्याच काम करतो.

पण मग अस का घडते.. का चुकीचे अर्थ लावले जातात…किंबहुना समोरचा खरंच चुकीच्या अर्थ लावतो कि आपल्याकडूनच त्या गोष्टी चुकीने घडलेल्या असतात ?

इतरांनी आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला आहे, याबद्दल आपण ८० ते ९० टक्के ठाम असतो, परंतु आपलीच सजगता त्या वातावरणात, त्या परिस्थितीत काम करत नसेल ना ? याचा विचार आपण करतंच नाही. आणि याचबाबत आज आपण मोकळेपणाने बोलूया.

तुम्ही सकाळी आंघोळ केल्यानंतर एखादी वस्तू दररोजच ठरलेल्या ठिकाणी ठेवता का ? कधीतरी राहून जात असेल. केस विचारण्यासाठी घेतलेला कंगवा कधीतरी असलेल्या जागेवर ठेवण्या व्यक्तिरिक्त तो बेडवरच राहिला असेल आणि हे असं कधी झालं, आपलंच आपल्याला माहित नाही. दुपारी तुम्ही बेड आवरण्यासाठी चादर झटकता, आणि बेडवर कोपऱ्यात असणारा तो कंगवा आता मात्र कोपऱ्यातून खाली पडतो.

संध्याकाळी घरातले सर्वजण तो कंगवा शोधतात. पण कोणालाच तो सापडत नाही. सर्वजण एकमेकांकडे बोट दाखवतात. मी आज तो वापरलाच नाही, मी घेतलेला आणि जागेवर ठेवला, आणि तुम्ही सुद्धा रोजच्या सवयीनुसार असेच उत्तर देता कि तो मी त्याच जागेवर ठेवला होता. कदाचित या एका कंगव्यावरून वाद-विवाद होण्याची सुद्धा शक्यता असते.

जर घरातली माणसं टापटिपीला आणि व्यवस्थापनाला महत्व देत असतील तर. हे एक उदाहरण झालं. आपलं मन त्यावेळी सजग नसण्याचं. कारण त्यावेळी तुमच्या मनातले विचार यामध्ये तुम्ही असे काही व्यस्त होता कि तुम्ही रोजच्या वास्तूबद्दल, व्यक्तींबद्दल आणि माणसांबद्दल काहीसे भान हरपून बसता.

आंघोळ करताना कित्येकदा असं होतं का ? शरीराचे अवयव साफ करताना आपल्याला तिकडे लक्ष द्यावं लागतंय. हे नेहमीचं काम असल्यामुळे मेंदूला ते काही गरजेचं वाटत नाही आणि शिवाय त्यावेळी तुमच्या डोक्यात असणारे विचार यामुळे कधी तो अवयव तुम्ही साफ केलात आणि कधी तुमची आंघोळ झाली, याचा थांगपत्ताच लागत नाही.

अगदी त्याचप्रमाणे, लोकं आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ का घेतात ? यासाठी आत्मचिंतन म्हणून वरील उदाहरण आपल्याला उपयोगी पडू शकतं. इथे सुद्धा कित्येक व्यक्तींची रोजच्या व्यवहारात आपल्याला सवय झालेली असते, विचार करून करून निर्माण होणारे पूर्वग्रह आपल्यात असणाऱ्या सजग क्षमतेला नुकसान करत असतात.

हा लेख तुमच्या अंतर्गत मनात निर्माण होणाऱ्या अवास्तव संकल्पना यावर नक्की उपाय म्हणून काम करू शकतो. आणि एखादी बाहेरील व्यक्ती सारखी सारखी चुकीचेच तुम्हाला ठरवत असेल तर, दुर्लक्षाय नमः !

आपल्याकडूनच काही गोष्टी राहतायेत का ? किंवा त्यावेळी असजगता असल्याने आपले पाचही ज्ञानेंद्रिय चुकीच्या दिशेने फिरलेले तर नाही ना  ? यावर हा लेख प्रकाश टाकणारा आहे.

न बोललेल्या गोष्टी ऐकणे, एखादी वस्तू त्या जागी ठेवली आहे कि नाही, हे न आठवता येणे, बोलता-बोलता मध्येच समोरचा दुखावेल असे वेगळे शब्द निघणे, रस्त्याने चालताना महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष असणे इत्यादी हि सगळी उदाहरणं तुम्ही त्यावेळी सजग नसण्याची आहेत.

यातूनच तुमच्याबद्दल इतरांची मते नकारार्थी बनत जातात. म्हणून लोकं चुकीचा अर्थ का घेतात ? हा प्रश्न तुम्हाला पडतो, कारण तुम्ही सजग नसता म्हणून तुम्ही लोकांचं बोलणं स्वीकारत नाही.

एखादा विनोद ऐकल्यानंतर सगळे हसतात, पण आपल्याला काही तो कळलेला नसतो. मुळात आपण तो नीट ऐकलेला नसतो. त्यावेळी मन सजग नसतं, ते दुसऱ्याच विचारांत कुठेतरी इन्व्हॉल्व झालेलं असतं.

तरीही आपण हसतो. आपल्याला कोणीही लेबल लावू नये म्हणून. पण मनातल्या मनात आपण पुन्हा तो रिपीट करत असतो. आणि मग नंतर तो विनोद कळतो, कारण तेव्हा मन सजग झालेलं असतं.

पुष्कळ परिस्थिती अश्या असतात कि त्याच वेळी सजग राहून आपल्याला तो प्रसंग हाताळायचा असतो. वेळ निघून गेली की सजग राहून सुद्धा काहीच उपयोग नसतो. तोपर्यंत लोकांनी आपल्याला त्यांची लेबलं चिटकवलेली असतात.

आणि त्यातूनच आपल्याला सर्वात जास्त आवडणारं लेबल म्हणजे, ‘लोकं माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ का लावतात ?’



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “लोकांकडून आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ का घेतला जातो?”

  1. मला खूप हसण्याची सवय आहे प्रत्येक गोष्टी वर आणि मी खूप वेळा प्रयत्न केला पण माझं हसणं मी कन्ट्रोल करू शकत नाही समोरचा कुठल्या भावनेतून बोलतो हे समजतो पण काय होत मलाच कळत नाही खूप हसायला येते काय करू सांगा प्लीज

Leave a Reply

error: Content is protected !!