Skip to content
Home » मनामध्ये साचलेलं हे नेहमीच वेदनादायी असतं !!!

मनामध्ये साचलेलं हे नेहमीच वेदनादायी असतं !!!

साचलेलं वेदनादायी असतं!


शिवाजी भोसले I 9689964143


अनेक वेळा काही किरकोळ घटना, प्रसंग व क्षणांनी मानवी जीवन काळवंडल जातं. आयुष्यात ‘नकोशा असलेल्या’ अनेक घटना, प्रसंग, क्षण कळत-नकळतपणे घडतात. त्यामुळे जीवन उदासवान होऊन बसतं. अनेक वेळा हे जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर गेलेलं असतं, मनात बोचऱ्या भावनांचं शल्य घेत जीवनाचं एकेक वर्ष मागे सारत जावं लागतं.

जीवनाचं ‘कडू गोड’ सर्वच मनात साठवून जीवनाचा प्रवास सुरळीत करावा लागत असतो. तेव्हा सावरणं आणि वावरणं खूप महत्त्वाचं असतं. ते प्रत्येकाला करता यायला हवं. नदी, नाला, ओढा असंख्य अडथळे, संकट पहाड ओलांडत वाहत असतो. त्याचं प्रवाही असणं निसर्गातील प्रत्येक घटकाला जगण्याचं दान भरभरून देत असतो. मानवाला जसं पाण्याच साचलेलं डबकं नकोस असतं, तसंच मनात साचलेलं आणि साठवलेलं सुद्धा नकोस असतं. मानवी मनात साचलेलं आणि साठवलेलं हे मनातून बाहेर काढता यायला हवं, कारण साचलेलं आणि साठवलेलं हे प्रचंड वेदनादायी असतं.

मानवी मनावर असलेली भावनांची व आठवणीची जळमटे बाजूला सारत आनंदाचं आणि उत्साहाचं जीवन जगावं. जेणेकरून प्रत्येकाचं जीवन समृद्ध होईल.
—–
जीवनाच्या स्मृर्ती पटलावर प्रत्येक व्यक्ती सोबत दिवसागणिक अनेक घटना, क्षण, प्रसंग घडत असतात. यामध्ये अनेक घटनांनी मानवी जीवन समृद्ध व सुखकर होत असतं. एखाद्या क्षणाला घडलेला प्रसंग आणि घटना मानवी जीवनाला प्रचंड मोठी कलाटणी देत असतो. यातून व्यक्तीचे संपूर्ण जीवनच बदलून जातं. अगदी भरभराटीच, तेजाचं, समृद्धीचं वातावरण मानवी जीवनात सोबत वावरत असतं. यातील प्रत्येक क्षण, प्रसंग घटना हर्षोल्लोषित, आनंदी व प्रसन्न करणाऱ्या असतात. जीवनात अगदी ‘सुखाचे चार चाँद’ लागलेले असतात. कुठलीच कमतरता न भासता निपून असं मानवी जीवन जगता येत असतं.

अनेक वेळा काही किरकोळ घटना, प्रसंग व क्षणांनी मानवी जीवन काळवंडल जातं. आयुष्यात ‘नकोशा असलेल्या’ अनेक घटना, प्रसंग, क्षण कळत-नकळतपणे घडतात. त्यामुळे जीवन उदासवान होऊन बसतं. अनेक वेळा हे जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर गेलेलं असतं, अखेरच्या टोकावर जाऊन बसलेले असतं. त्या क्षणाला व परिस्थितीला ‘जीवनच नकोस’ वाटतं. पण नाईलाजास्तव जीवनाचं रहाट गाणं गावच लागत असतं. मनात बोचऱ्या भावनांचं शल्य घेत जीवनाचं एकेक वर्ष मागे सारत जावं लागतं. जीवनाचं ‘कडू गोड’ सर्वच मनात साठवून जीवनाचा प्रवास सुरळीत करावा लागत असतो. तेव्हा सावरणं आणि वावरणं खूप महत्त्वाचं असतं. ते प्रत्येकाला करता यायला हवं.

मानवी जीवनात धडपडण्याचं आणि घडण्याचं वय असलं की अनेक अडथळ्यांना व अडचणींना सामोरे जावे लागत असतं. आयुष्याच्या प्रवासात कोणता क्षण, प्रसंग, घटना कशाप्रकारे तुमच्या पुढ्यात उभी ठाकलेली असेल हे नियतीला सुद्धा माहिती नसतं. नियतीचं सुद्धा एक विलक्षण कोडं मानवी जीवनात कधीच सुटत नसतं. ते सोडताही येत नसतं आणि टाळता येत नसतं. त्याला सोबत घेऊन चालावं लागतं.

कधी जाणीवपूर्वक लक्ष दुर्लक्ष करावं लागत असतं, त्यामुळे प्रासंगिकतेच भान आणि वर्तमानाची जाण ही असावीच असावी लागते. या मानवी आयुष्यात घडलेले क्षण, प्रसंग घटना काळाच्या सोबततीलाच मागे सोडावे लागत असतात. त्यांचं स्थान हे भूतकाळातच योग्य असतं त्यांना वर्तमान व भविष्य काळात आणलं की दुःखाचे डोंगर उभे व्हायला वेळ लागत नाही. अशा नकोशा असलेल्या घटना, प्रसंगांना वर्तमानाचा स्पर्श झाला की भविष्याचा भावार्थ बदलत जातो. त्यामुळे वर्तमानात जगणं आनंदाचं उत्साहाचं असावं असं वाटत असेल तर भूतकाळाचं लेणं वर्तमानात कधीच देणं ठरू नये. याची खबरदारी घेणे नितांत गरजेचं असतं. अन्यथा वर्तमानाचं व भविष्याचं सुद्धा वाटोळं होण्यास मार्गक्रमण सुरू होतं.

आयुष्याच्या प्रवासात अनेक घटना क्षणिक ठरत असतात. त्यांना फारसं कवटाळून बसायचं नसतं. त्या क्षणात विस्मरणात जाऊन बसतात तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी, क्षण, प्रसंग, घटना कायमस्वरूपी काळजाच्या खोलवर कोरल्या जातात. अशा घटनांनी मानवी मान प्रत्येक क्षणाला काळवंडल जातं. नको असलेल्या क्षणांना पुन्हा पुन्हा आठवून स्वतःचं भावविश्‍व स्वतः मग्न केलं जातं आणि आणि ते अश्रूच्या रूपाने बाहेर पडतं. तात्पुरता क्षणात विसरल्या जाणाऱ्या घटनांच जीवनात फारसं महत्त्व नसतं. ‘हवेची झुळूक यावी आणि निघून जावी’ अशा ह्या घटना येतात आणि निघून जातात, त्याचं माणसाला कोणतंच अप्रूप वाटत नसतं. पण मनाच्या खोलवर रुतलेल्या आणि रुजलेल्या घटनांना आयुष्यभर सोबत करावी लागत असली की अशा घटना मनाच्या काळीज कप्प्यातून पुन्हा पुन्हा उफाळून येतात. आणि मन पुन्हा पुन्हा ओलचिंब व्हायला लागतं.

मानवी मन ओलंचिंब का व्हावं? त्यामध्ये साचलेलं व साठवलेलं असं काही वेदनादायी असावं. त्यामुळे मन अधिक बैचेन होत असावं. बालपणापासून तर सद्यस्थिती पर्यंत घडलेल्या अनेक क्षण, प्रसंग, घटनांनी मनास दुःखद बोचरा स्पर्श केला असावा. आणि मानवी मनाच्या काळीज कप्प्यात त्या आठवणी कायमस्वरूपी घर केलेलं असावं. आयुष्याचं एक एक पाऊल पुढे टाकलं जातं, तसतसं आठवणींचं गाठोडं मागे बांधले जात असतं. हे गाठोडं कुणी मुक्त हस्ताने तर कोणी घट्ट बांधत. त्यामध्ये काय साठवायचं? काय काढून घ्यायचं ? काय शोधायचं? काय सोडायचं? आणि काय धरायचं? हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं.

त्याचं सुयोग्य नियोजन ज्या व्यक्तीला जमलं त्याच्या आयुष्याचं जगणं सुमधुर होत जातं. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर मनामध्ये असंख्य, क्षण, घटनांचा संचय होत असतो. व्यक्तीचा जसं वय वाढत जातं, तसं तसं हा संशय अधिक वाढत जातो आणि यातून जीवनाची शिदोरी साकार होत जात असते.

एखाद्या नदी-नाला ओढ्याला खळखळाट असला की त्याचं मुक्त वाहनं व वावरणं निसर्गाला आनंददायी करून जातं. मात्र त्याच ओढ्याचं, नदीचं आणि नाल्याचं डबकं झालं की मग अनेक प्रश्न उपस्थित व्हायला लागतात. स्वतःचं डबक करून घेणं, त्या नदी-नाल्याला केव्हाच मान्य नसतं. मात्र परिस्थिती, वर्तमान आणि वास्तव यातून कळत नकळत स्वतःच डबकं करून घेतलं जातं.

नदी, नाला, ओढा असंख्य अडथळे, संकट पहाड ओलांडत वाहत असतो. त्याचं प्रवाही असणं निसर्गातील प्रत्येक घटकाला जगण्याचं दान भरभरून देत असतो. मात्र एखाद्या उंचवट्याने स्वतःचं प्रवाही असणं थांबावं लागतं. त्यांचं थांबणं हे अनेक समस्या संकटांना आमंत्रण देत असतं. डबके साचले की त्यावर डास मच्छर रोगराई पसरत असते. त्यातून मानवी जीवन सुद्धा विस्कळीत होत असतं. मानवाला जसं पाण्याच साचलेलं डबकं नकोस असतं, तसंच मनात साचलेलं आणि साठवलेलं सुद्धा नकोस असतं. पण काही क्षणांनी, घटनांनी ते मानवी जीवनात लादलेलं असतं. असं लादनही योग्य नसतं.

मनाच्या कोपऱ्यात एखाद्या घटनेनं घर करावं आणि शरीरावर जखमीनं कोरावं, दोघांचेही दुखणं सारखंच असतं. शरीरावर झालेल्या जखमेतून पू बाहेर येतो, पण हा पू बाहेर येण्यापूर्वी त्या जखमेचं ठणंठणं सुरूच असतं. शरीरातील जखमेत पू असणं हे जखम अधिक चिघळण्याचं लक्षण असतं. जोपर्यंत जखम ठणका मारत राहते तोपर्यंत ती बरी होत नाही एकदा का जखमेतून पू बाहेर आला की, अगदी गंभीर स्वरूपाची जखम सुद्धा बरी होण्यास मदत होते.

मात्र जखमेतून पू बाहेर काढता यायला हवं. तसेच मानवी मनाचं सुद्धा असतं. मानवी मनात साचलेलं आणि साठवलेलं हे मनातून बाहेर काढता यायला हवं, कारण साचलेलं आणि साठवलेलं हे प्रचंड वेदनादायी असतं. ते राहून राहून ठणका मारत असतं आणि वेदनेला पुन्हा जन्म घालत असतं. त्यामुळे मनातील क्षण घटना, घडामोडींचं निचरण होणं प्रचंड गरजेचं असतं. कित्येक गोष्टींना विसरतो म्हटलं तरी ते विसरता येत नसतं. ते पुन्हा पुन्हा उफाळून येतं आणि डोळ्यांच्या कडातून बाहेर पडतं. आठवणींच भावनांचं साचलेपण मनाला अधिक खालावत घालत.

मनावरची ही नकोशी जळमटंही परत परत डोकं वर काढत राहतात आणि मनाला झाकोळून टाकतात. मनाचं हे झाकोळनं मनालाही मान्य नसतं. यातून आसवांचं ओघळणं सुरू होतं. त्यामुळे मनात साचलेलं बाहेर काढला नितांत आवश्यक असतं.

मनाला त्रासदायक असलेलं आणि जिवनाचं आठवणीत रूपांतर होणार उपयोगी व निरुपयोगी बाजूला सारावं. मानवी मनावर असलेली भावनांची व आठवणीची जळमटे बाजूला सारत आनंदाचं आणि उत्साहाचं जीवन जगावं. जेणेकरून प्रत्येकाचं जीवन समृद्ध होईल.

याआत्मभान जगण्याचं !



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!