Skip to content
Home » अपेक्षांचा मानसिक त्रास झाल्यास तो शांत कसा करावा ??

अपेक्षांचा मानसिक त्रास झाल्यास तो शांत कसा करावा ??

अपेक्षांचा मानसिक त्रास झाल्यास तो शांत कसा करावा ??


मिनल वरपे


इतर व्यक्तींमुळे त्यांच्या वागण्यामुळे आपण स्वतःला लगेच त्रास करून घेतो आणि हा त्रास कसला असतो तर इतरांकडून आपल्याच नको असलेल्या अपेक्षा..

कोणतीही व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली, ती व्यक्ती आपल्याला कितीही जवळून ओळखत असेल..आपण काहीच न बोलता आपल्याला समजून घेत असेल तरीसुद्धा काहीवेळेस त्या व्यक्तींनी आपल्याला हवं तसं नाही वागल की आपल्याला लगेच वाईट वाटते.

खरं तर आपल्या जवळची माणसं आपल्याला ओळखत असतातच पण काहीवेळेस आपल्या अपेक्षा बदलतात.. परिस्थिती आणि आपल्या मूड नुसार आपण वेगळे विचार करतो आणि आपले ते विचार इतरांना सहसा कळून येत नाहीत.आणि त्यामुळेच ते आपल्याशी नेहमीप्रमाणे वागतात पण आपलंच वागणं आपले विचार बदललेले असल्याने आपल्याला त्यांचं वागणं बोलणं वेगळं वाटते.

आणि आपलं वागणं म्हणजे आज सर्व मनासारखं घडलं म्हणजे आपण आनंदी आणि तेच जर थोड जरी मनाविरुद्ध घडलं तर आपला लगेच मूड बिघडतो.

जे आहे ते स्वीकारलं की अपेक्षांचं ओझ ना आपल्याला जाणवत ना आपल्यामुळे इतरांना.. म्हणतात ना ती व्यक्ती कायम समाधानी असते जी समोर जे आहे ते काहीच तक्रार न करता स्वीकारते कारण समोर असेल ते स्वीकारलं की हे अस का .. ते तस का.. मला हेच हवं होत .. मला तेच हवं आहे या आपल्या अपेक्षांना जागाच उरत नाही.

शिवाय जे आहे ते स्वीकारलं की आपल्या इतरांकडून असलेल्या अपेक्षा म्हणजेच याने माझ्याशी असच वागायला हवं,त्याने मला विचारूनच सर्व केलं पाहिजे, त्यांनी मला काहीच सांगितलं नाही असे कसे वागले यांसारख्या अपेक्षा यांना सुद्धा आपण स्वतःकडे वेळ ठेवत नाही.

जेव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे काही घडत नाही त्यावेळी समोर कितीही आनंद असेल तरी आपल्याला तो उपभोगता येत नाही कारण आपण आपल्याच अपेक्षांमधे इतकं अडकतो की आपल्याला त्या आनंदाचा आस्वाद घेता येईल अशी आपली मानसिकता राहत नाही.

म्हणून जास्तीत जास्त निरपेक्ष राहील तर इतर जरी चुकीचे वागले तरी त्याचा त्रास आपल्याला होणार नाही. आणि आपणसुद्धा स्वतःकडून त्याच अपेक्षा करायच्या ज्यांचा त्रास आपल्याला होणार नाही.

आपल्या अपेक्षांचा प्रत्यक्ष संबंध हा आपल्या वास्तवतेशी असायला हवा. जितक्या वास्तव अपेक्षा असतील तितक्या त्या आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आपल्याला मदत करतील. इतरांनी माझ्या अपेक्षा पूर्ण कराव्यात किंवा माझ्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी इतरांना कमला लावणं हे ही सुद्धा एक अवास्तव अपेक्षा आहे.

तुमच्या अपेक्षांसाठी तुम्ही राबत आहात, जो पर्यंत हे वातावरण सभोवताली पसरत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी आकर्षणाचा नियम कुचकामी ठरेल. म्हणून आधी जगण्याचं ध्येय निश्चित करा, तुमची तीच वास्तविकता असेल. एकदा वास्तवतेची जाणीव झाली कि तशा अपेक्षांचं सुद्धा व्यवस्थापन करणं सोपं जातं.

मग कोणत्या अपेक्षा निरर्थक आणि कोणत्या फायदेमंद याची आखणी करता येते. तसेच महत्वाचा भाग म्हणजे व्यवस्थापित केलेल्या अपेक्षा कशा पूर्ण करायच्या आणि कश्या पूर्ण करून घ्यायच्या यातलं चातुर्य सुद्धा यायला लागतं.

मग त्या अपेक्षा पूर्ण जरी झाल्या नाही किंवा अर्धवट जरी राहिल्या तरी त्याचा मानसिक त्रास आपल्याला होणार नाही आणि जरी तो झाला तरी तो फार काळ टिकणार नाही. कारण आपलं लक्ष आपल्या ध्येयाकडे असेल.

म्हणून अपेक्षा पूर्ण न होण्याची हि क्षुल्लकता मनात तेव धरत राहणार नाही.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!