काही नाती आपल्याला न बोलता साथ देत असतात…
सौ. मिनल वरपे
आयुष्यात अशा एका व्यक्तीची गरज असते ज्या व्यक्तीला आपल्या मनाची स्थिती सांगायला शब्दांची गरज लागत नाही…
तिची ती अवस्था बघून सगळ्यांना प्रश्न पडला की तिला नक्की काय झालं असेल.. अशी का वागते ही.. आपण इतकं विचारतोय पण तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नाही तिच्या…मग मात्र सर्वांची चिडचिड होते कारण तिला तिच्या नाराजीच कारण विचारून सगळे हैराण झालेले असतात..
अग तू आत्ताच तर एकदम छान हसत होतीस आणि मग अचानक रडायला नाराज व्हायला कारण तरी काय.. सगळ्यांचा प्रश्नांचा भडीमार इतका होता की तीच मन जास्त भरून आल.. बोलण्याचा प्रयत्न जर केला असता तर नक्कीच अजून जास्त रडू आल असत.. म्हणून ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण तिला काही जमत नव्हतं..
अगदी त्याचवेळी तिची आई बाजारातून परतली.. आईने तिच्याकडे पाहिलं.. ती आईच्या मिठीतच गेली आणि शांत झाली..
सगळे एकदम अवाक झाले.. आपण कधीचे इतकं विचारतोय पण ही काहीच बोलली नाही आणि आई येताच तिच्या मिठीत एकदम शांत कशी झाली ही..
खरं तर तिच्या रडण्याचे कारण आईला समजल होत.. आजच्या दिवशीच तिची जिवलग मैत्रीण कायमची तिला सोडून गेली होती.. मैत्रिणीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे ती स्वतःला सावरत तर होती पण मधेच अचानक तिच्या आठवणीने तिचं मन हळवं व्हायचं..
सकाळपासून ती जरी हसण्या खेळण्याचा प्रयत्न करत असली तरी आईच्या नजरेत ते चुकलं नव्हत.. म्हणूनच घरी आल्यावर आईला आश्चर्य वाटल नाही कारण आई तिला चांगलच ओळखत होती.. सकाळपासून कितीही तिने रडू टाळलं असल तरी ही वेळ येणारच हे आईला पक्क माहीत होत.. आणि यामुळेच आईला माझ्या रडण्याचे कारण कळलं आहे हे तीलासुद्धा माहीत होत म्हणूनच आई आल्यावर तिला आधार वाटला..
रोहन आणि अनिष लहानपणापासून खूप घट्ट मित्र.. सोबत शाळा.. क्लासेस.. एकमेकांच्या घरी जाऊन खेळणं.. मज्जा मस्ती.. नंतर दोघांची नोकरी वेगवेगळ्या शहरात त्यामुळे दोघांना नेहमीच भेटायला जमायचं नाही.. कामात व्यस्त असल्यामुळे सारखं फोन करून गप्पा मारणं सुद्धा शक्य नव्हतं.. पण तरी सुद्धा त्यांच्यात इतकी चांगली मैत्री की काहीही घडल की अचानक फोन केल्यावर एकमेकांना सांगणार..
जर आनंद असेल तर आपण हसत सांगतोच आणि काही अडचण असेल तर आवाजावरून ओळखायचं..आणि काहीच न विचारता समोरच्याला आधार वाटेल असा धीर द्यायचा… आणि त्यांच्यात असलेलं bonding खूप वेगळच होत.. मित्र म्हणून फक्त भेटणं बोलणं आणि मज्जा करणे अस नसून त्यांना एकमेकांना ओळखता यायचं आणि शब्दाची गरज न पडू देता ते एकमेकांना समजून घ्यायचे..
कामाच्या ठिकाणी सुद्धा असे चांगले मित्र आपल्याला भेटतात जे आपल्या मनाची स्थीती सहज ओळखतात .. आणि आपल्याला पुढे जाण्याची हिंमत देतात.. त्या मित्राला पाहिलं की कामाचा अर्धा ताण हलका वाटतो आणि काहीही घडल तरी कोणाकडे व्यक्त होण्याची गरज पडत नाही कारण शब्दाची गरज न पडता त्याला सगळं समजलेलं असते..
एक साधा विचार मनाला सुखावून जातो जेव्हा अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते जी आपल्या मनातलं सहज ओळखते, तिच्यापुढे शब्दात व्यक्त होण्याची गरज पडत नाही..आणि ती व्यक्ती कोणीही असू शकते.. आपली आई, बहिण, वडील,भाऊ, मित्र,. मैत्रीण , नात्यातली अगदी कोणीही…
जिथे शब्दांची गरज जाणवत नाही अस नात कायम आपल्याला न बोलता साथ देत असते.. आपली मनाची अवस्था समोरची व्यक्ती ओळखते ते ही काहीच न सांगता आणि आपल्याला समजून घेते ही कल्पनाच मनाला समाधान देते.. आणि अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्कीच असावी तेव्हाच आपल्या बिघडलेल्या मनःस्थितीत आपण चुकीचे विचार करून, चुकीचं वागणार नाही आणि त्यातून सहज बाहेर पडू..
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!