Skip to content
Home » त्यांच्या प्रेमाचा शेवट अशा सुरुवातीने झाला…

त्यांच्या प्रेमाचा शेवट अशा सुरुवातीने झाला…

त्यांच्या प्रेमाचा शेवट अशा सुरुवातीने झाला…


टीम Healthy मानसशास्त्र


त्यांच्यात ना मैत्री होती ना आधी कोणती ओळख .. त्याला ट्रेकिंग करायला खूप आवडायचं आणि तीला वेगवेगळ्या पर्यटस्थळांना भेट देण्याची आवड.. आणि दोघेही त्यांच्या आवडी जपताना.. एका उंच गडाच्या पायथ्याशी एकमेकांसमोर आले..

हिरवागार निसर्ग.. ढगाळ वातावरण.. मधेच होणारा रिमझिम पाऊस या सुंदर वातावरणात अजूनच उत्साही आणि बेधुंद वाटत होत.. आणि त्याचाच आनंद घेताना तिचा आनंदी चेहरा त्याला दिसला आणि बघता क्षणीच त्याला कसलच भान राहिलं नाही.. तो इतका तिच्याकडे एकटक पाहात होता की तीलासुद्धा त्याची नजर जाणवली..मग ती हसता हसता शांत झाली आणि त्याच्याकडे रागात बघू लागली..

तो लगेच भानावर आला .. नंतर एकाच वेळी दोघेही त्या निसर्गरम्य ठिकाणचं आनंद घेत पुढे जात होते. हळूहळू त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.. तीलासुद्धा त्याच्या नजरेतला खरेपणा जाणवला आणि दोघांची ओळख झाली.

नंतर त्यांचं बोलणं सुरु झालं..दोघांची आवड सारखी असल्यामुळे खूपच गप्पा रंगल्या… आपापले जुने किस्से सुद्धा ते एकेमकांना सांगू लागले.. त्यातूनच एकमेकांचे स्वभाव दोघांनाही कळले..

आपल्यासोबत कोणी आलेलं याचा दोघांनाही जसं विसरच पडला होता..नंतर घरी परतायची वेळ झाली.. दोघांनीही एकमेकांना स्वतःचे मोबाईल नंबर दिले.. त्या रम्य निसर्गात त्या दोघांची झालेली ओळख कधी प्रेमाच्या धाग्यात बांधली गेली कळलच नाही..

घरच्यांना सांगून सर्वांच्या परवानगीने दोघांनी लग्न केलं.. दोघ खूप आनंदाने, एकमेकांना समजून साथ देत छान संसार करू लागले.. पण अडचणी, संकट सांगून नाहीना येत.. लग्नाला कसे २ वर्ष झाले कळलं सुद्धा नाही.. घरच्यांचा आग्रह आणि त्या दोघांनाही वाटू लागले की आता आपल्याला एक मूल झालं पाहिजे जे घराचं नंदनवन करेल. दोघेही पुढची स्वप्ने पाहू लागले. मुलगा हवा की मुलगी.. त्यांचं नाव काय ठेवायचं.. अगदी तेच स्वप्न जे प्रत्येक आई वडील मुलांसाठी बघतात…

प्रयत्न करूनही त्यांना मुल मात्र होत नव्हतं.. शेवटी डॉक्टरकडे जाऊन दोघांनीही तपासणी केली.. आता रिपोर्ट काय असेल याची दोघांनाही धाकधूक होतीच.. पण रिपोर्ट मात्र दोघांनाही स्तब्ध करणारा होता.. रिपोर्ट नुसार त्याच्यात दोष होता त्यामुळे मुल होन शक्य नव्हत..

त्याच्यासाठी हा मोठा धक्का होता.. माझ्यामुळे आज आमची स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही हा विचार त्याला रात्रंदिवस झोपू देत नव्हता.. पण ती मात्र अजिबात घाबरली नाही.. त्यावेळी थोडस रडू आल तिला पण नंतर तिने मनाची तयारी केली..

तिने त्याला समजावल की तू अजिबात काळजी करू नकोस. आपण दोघे आहोत एकमेकांसाठी.. आणि जर तुला कोण काय म्हणेल याची चिंता वाटत असेल तर सरळ माझ्यात दोष आहे अस सांगून मोकळं हो..

आणि अजून एक खूप छान कल्पना आहे माझ्याकडे.. खरतर हे संकट नसून आपल्यासाठी आलेली संधी आहे.. गर्भवती झाल्यावर प्रत्येक स्त्री ला तसेच तिच्या घरच्यांना वाटत असते की मुलगा होईल की मुलगी.. त्यांना निवड करण्याची संधी नाही मिळत पण आपल्याला मात्र मुलगा हवा की मुलगी याची निवड करण्याची खूप छान संधी मिळाली आहे.. हे ऐकल्यावर तो अवाक झाला.. अग काय बोलतेस हे.. लोक काय म्हणतील.. आणि बोलण्याइतक सोप आहे का हे…

त्यावर ती म्हणाली.., आपली आर्थिक स्थिती इतकी उत्तम आहे की आपल्याला एखाद्या अनाथ आश्रम मधे जाऊन मुल दत्तक घेता येईल.. त्या बाळाचं लहानपणापासून आपल्याला हवे तसे संस्कार देता येतील. त्याचे लाड करता येतील.. त्याच्यामागे धावता येईल… त्याला घास भरवताना गोष्टी सांगता येतील.. रात्री झोपवताना त्याला अंगाई गाता येईल..

काय वेगळं असेल सांग ना.. जे जन्म दिलेल्या मुलांचं करायचं तसच ते सुद्धा मुलच आहे ना.. लोक आपल्या मुलांचे वाढदिवस असले की अनाथ आश्रम मधे जाऊन खाऊ वाटतात. कधीतरी भेट देतात . आपण तर ज्या मुलांचे आई वडील नाहीत त्याला त्याचे आई-वडिलांसारखं प्रेम देणार.. अजून काय हवं आयुष्यात..

तीच हे सगळं ऐकत त्याचे डोळे भरून आले आणि ते सुद्धा कौतुकाने.. खरचं जर तुझ्यासारखा जोडीदार असेल तर आलेल्या दुःखात सुद्धा आनंद कसा शोधायचा हे प्रत्येकाला कळेल..लग्न, प्रेम म्हणजे फक्त सुखात साथ देणं नाही तर आलेल्या दुःखात अडचणीत सुद्धा एकमेकांना साथ देणे हे आज तुझ्याकडुन शिकलो.. आणि हा मुलांचा विचार तर सर्वांनीच करावा इतका छान विचार केला तर लोक काय म्हणतील याच्याशी काही देणंघेणं राहणारच नाही.. आणि प्रत्येक जोडप आनंदाने संसार करेल…



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!