Skip to content
Home » गोंधळलेलं मन आणि आपण !!!

गोंधळलेलं मन आणि आपण !!!

गोंधळलेलं मन आणि आपण !!!


सौ. मिनल वरपे


घरात एखादी व्यक्ती आजारी झाली की सगळ्या घरातले माणसं त्या व्यक्तीला वेगवेगळे उपाय सांगतात. समजा जर खोकला झालाय तर कोमट पाण्यात मीठ आणि हळद टाकून गुळणा कर अरे गूळणा नको ते पाणी प्यायच त्याने लवकर आराम मिळेल, अरे एक काम कर मधात हळद घालून ते चाटण घे म्हणजे घसा खवखवणार नाही.. अरे आल्याचा तुकडा तोंडात चघळत रहा.. अरे गूळ हळद अगदीच सोप आहे.. अरे सगळ्यात गुणकारी म्हणजे दूध हळद प्यायच…

हुश््श… येतोना थकवा ऐकूनच हे सगळे उपाय.. आणि ती आजारी व्यक्ती काय करते यातला एक एक उपाय करून बघते.. सकाळी एक तर दुपारी वेगळं.. आणि रात्री अजून तिसरा उपाय असतोच.. याने होते काय तर झालेला आजार लवकर बरा तर होतच नाही आणि ती व्यक्ती मात्र हे वेगवेगळे प्रयोग करून वैतागते.. मग शेवटी ठरवते एकच कोणतातरी उपाय करून त्यातून बर व्हायचं..मग तो यातला एखादा उपाय नाहीतर डॉक्टरांच्या गोळ्या..

आणि अस केल्यामुळे आपण लवकर बरे होतो त्या एकाच उपयावर विश्वास ठेवून.. ते सुद्धा न वैतागता आणि चिडचिड न करता.

आपलं आयुष्य सुद्धा असच होते जेव्हा आपण एकाच विचारावर विश्वास ठेवत नाही.. एकाचं निर्णयावर ठाम राहत नाही.

मला जे करायचं आहे ते सहज सोप जरी नसेल तरी ते अशक्य तर नाहीना असा ठाम विश्वास स्वतःवर ठेवला तर वेगवेगळ्या विचारांनी आपण भरकटणार नाही.

जर मला अभ्यास करायचा आहे मी गणिताचा अभ्यास करत आहे पाच मिनिट होत नाही तर मी इतिहास हा विषय घेतला अभ्यासासाठी नंतर मनात आल की नको आता वाचन न करता चित्र काढायचं.. अशामुळे कोणत्याच विषयाचा योग्य अभ्यास तर नाहीच होणार आणि पुढे अचानक एकावेकीच जेव्हा अभ्यास समोर दिसेल तेव्हा कोणीही सहज गोंधळून जाणार त्यापेक्षा जो विषय हातात घेतला आहे तोच पूर्ण करून मग दुसरा घेतला तर योग्य पद्धतीने अभ्यास होणार.

विचार केला की मला आता नोकरी करायची आणि क्षणातच विचार केला की कुठे मिळतेय हल्ली हवी तशी नोकरी..त्यापेक्षा एखादा व्यवसाय सुरु करायचा.. आणि मग काही वेळ जात नाही तर मला जमेल का व्यवसाय करायला.. नको त्यापेक्षा नोकरी चांगलीच..आणि नोकरी करताना मात्र अजून मनात गोंधळ उडणार की व्यवसाय केला असता तरच बर झाल असत.

कोणतीही गोष्ट करताना हा काय सांगतो.. त्याच मत एकदा ऐकून घेऊ.. अस केलं तर बाकीचे काय बोलतील.. त्यानेसुद्धा हेच केलेलं एकदा त्याचा सल्ला घेतो… अशा आपल्या विचारांमुळे आपला स्वतःवर असलेला विश्वास कमी होत जातो आणि आपण एकाच मतावर न राहता.. जे जस ऐकू तसच करण्याचा प्रयत्न करतो आणि यश मिळालं नाही तर माघार घेतो यापेक्षा कोणताही विचार असा करावा ज्यावर आपला स्वतःचा विश्वास असेल आणि तो आपण पूर्णत्वास नेऊ.

या स्थितीला चंचल स्थिती सुद्धा म्हणता येते आणि हे तेव्हाच घडते जेव्हा आपण कधीच एका विचारावर ठाम नसतो. क्षणाक्षणाला आपले निर्णय बदलण्याचं काम आपले विचार करतात. म्हणून ज्यावेळी आपण काही करण्याचं ठरवतो तेव्हा आपल्या त्या विचारावर आपला पूर्ण विश्वास पाहिजेच तेव्हाच ते एक योग्य ध्येय आपल्याला निर्माण करता येईल आणि ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही..



तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

error: Content is protected !!