लग्नानंतर काही दिवसातच भांडणं का सुरु होतात ??
मिनल वरपे
प्रेमात असताना किंवा लग्न जमल्यानंतर सुरवातीच्या दिवस खूप छान वाटतात पण तेच काही महिने झाले तर पूर्वीसारखा उत्साह जाणवत नाही असे अनेक जणांना जाणवते. आणि यामधे आपण एकमेकांना तू पहीलेसारखा नाही राहिलास किंवा तू पहीलेसारखी वागत नाही असे एकमेकांना दोष देत आपण नात्यातील गोडवा कमी करतो.
खर तर आपले स्वभाव आपलं वागणं तेच असते पण बदल होतो तो आपल्या नात्यातील जबाबदारीने. आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर आपल्या सहज लक्षात येईल की आपल्या दोघात कुठे आणि कसे बदल झाले आहेत.
लग्नाआधी आपल्याला फक्त शिक्षण, नोकरी आणि थोडीफार घरातील कामे यातच लक्ष द्यावे लागते पण लग्नानंतर मात्र नोकरी करताना नोकरिसोबतच लाईटबिल,. पाण्याचं बिल.. किराणा सामान.. घराचं maintanance त्याच बरोबर घरातील माणसांना काय हवं या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं.
मुलीने घरी जरी अभ्यास नोकरी सोडून कोणत्याही कामाला हात लावला नसेल तरी लग्नानंतर घरची सून म्हणून असो नाहीतर अर्धांगिनी म्हणून घरातील सर्व कामात मदत करावीच लागते आणि ती जर नोकरी करत असेल तरीसुद्धा घरातील काम आवरून सगळं सांभाळावं लागते.
दोघांच्याही जीवनात हा झालेला मोठा बदल असतो आणि यामुळेच या जबाबदाऱ्या सांभाळत असताना दोघांनाही एकमेकांना हवा तसा वेळ देता येत नाही. लग्नाच्या सुरवातीला काही वेळ दोघांनाही या जबाबदाऱ्या लगेच दिल्या जात नाहीत. पण संसार म्हंटला की या जबाबदाऱ्या येतातच आणि हळूहळू त्या वाढत जातात.
ज्यांनी आपल्या घरातील अनेक जबाबदाऱ्या सांभाळायचं काम आधीच घेतलेलं असते, ज्यांना घरातील परिस्थितीची जाणीव असते, कामांची माहिती असते अशांना त्या जबाबदाऱ्या जड जात नाही. पण ज्यांना कायम लाडात वाढवलं आहे, ज्यांना परिस्थितीची जबाबदाऱ्यांची जाणीव नसते, ज्यांनी कायम स्वतःच्या आवडी, शिक्षण यातच लक्ष दिलय त्यांचा अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्या सांभाळताना गोंधळ होतो.
आणि दोघांनाही फक्त घरातील कामाच्या, वस्तूंच्या जबाबदाऱ्या नसतात तर त्यासोबतच नाती जपणे सांभाळणे, कोणाला काय हवं काय नको याकडे लक्ष देणे, येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी, आव्हाने सुद्धा असतात.आणि या सर्वात एकमेकांशी सतत बोलायला,. वेळ घालवायला जमत नाही.
आणि आपण एकमेकांच्या जबाबदाऱ्या जाणून न घेता फक्त वेळ नाही देत, पूर्वीसारखं वागत नाही असे बोलून नात पुढे सरकत नसते. खर तर इथे आपण एकमेकांना साथ देण्याची गरज असते. वेळ देत नाही असे म्हणण्यापेक्षा जमेल तेवढी एकमेकांना मदत करून एकमेकांना लवकर मोकळं करायचं मग एकमेकांना वेळ नक्कीच मिळेल.
तुझा स्वभाव तुझ वागणं बदललं हे बोलून तक्रार करण्यापेक्षा त्याच्या/ तिच्या जबाबदाऱ्या, त्याची होणारी कसरत जाणून घेऊन एकमेकांना आनंदी ठेवायचा प्रयत्न केला तर या तक्रारी उरणार नाही. कारण अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्या सांभाळताना कुठे कस वागावं काय करावं हे ज्याचं त्याला सुचत नसते आणि यामुळे आपण इतरांशी काय वागतो काय बोलतो याचासुद्धा भान राहत नाही.म्हणून अशावेळी एकमेकांना समजून घेतलं तर सर्व सोप्पं होईल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!